Saturday, October 20, 2018

"मनुष्य गौरव"

||श्री:||

"मनुष्य गौरव दिन"


        ज्या ज्या ऋषितुल्य व्यक्तींमुळे माझ्या जीवनाला, विचारांना आकार आला त्यातील एक ऋषीतुल्य विभूतिमत्व म्हणजे "प.पु. दादा" (अर्थात पांडुरंग शास्त्री वैद्यनाथ शास्त्री आठवले).

          रायगड जिल्ह्यातील रोह्या सारख्या छोट्या गावात जन्माला येऊन सुद्धा भारतीय संस्कृतीचा सुगंध दिगंतरात घेऊन जाऊन कीर्ती प्राप्त केलेला "अगस्ती".
         
             कोणतीही सत्ता, सामर्थ्य मागे नसताना सुद्धा पूर्व व पाश्चिमात्य संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणाररी तत्वज्ञान विद्यापीठा सारखी पूर्णतः देवावर विसंबून असलेली संस्था यशस्वी रीतीने चालवून जणू काही प्रतिसृष्टी निर्माण करणारे "विश्वामित्र". 

           जीवनात असंख्य चढउतार येऊन सुद्धा आयाचक व्रताने आ.ताईंसोबत आदर्श संसार करणारे "वसिष्ठ". 
   
      योगेश्वर कृषीच्या रूपाने भगवंताचं शेत करणारे लाखो पुजारी तयार करुन कृषीतून वैचारिक क्रांती घडवणारे "गौतम".
   
       ज्ञान-कर्म-भक्ती ह्या चिरंतर "त्रयी"चा संगम घडवून "त्रिकाल संध्येच्या माध्यमातून" सन्मिलित पुनरुज्जीवन करणारे "अत्री". 

       जात-पात-पत-प्रतिष्ठा-पॉवर(ताकद) ह्यांचे जोडे बाहेर ठेवायला लावून; भगवंताच्या समोर एक परिवार म्हणून एकाच बैठकीवर बसून स्वाध्याय करायला लावणारे. ज्याला अध्यात्मात कोणीही थारा दिला नाही त्या प्रत्येकाला आपलेसे करणारे "कश्यप"
       
           भगवान श्रीकृष्णाच्या गीतामृतांतुन वेळ आली तर २१ वेळा पृथ्वी नरेशांना आव्हान देण्याचे सामर्थ्य ठेवणारे आत्मविजयी परशुराम निर्माण करणारे "जमदग्नी"

           अश्या एक ना अनेक रुपांत सात रंग भरून भाव-सौरभ भरणारे दादा आज ही माझ्या सारख्या लाखो स्वाध्यायींच्या हृदयात कायम आहेत.

ज्याच्या दिवसांची सुरुवात "कराग्रे" नी होते. तो स्वाध्यायी .....

भगवंत माझा आहे....,
भगवंत माझ्या सोबत आहे ......,
भगवंत माझ्यातच आहे ....
व माझ्या प्रत्येक कर्माला तो साक्षी आहे ही जाणीव ठेवणारा प्रत्येक जण स्वाध्यायी ....

भले त्याचे हात तो आज केंद्रात जात असो वा नसो.....

एकदा स्वाध्यायी .... जीवनभर स्वाध्यायी .....
कारण जीवन भरुनही दहा अंगुळे उरण्याची ताकद ही स्वाध्यायात आहे....
गीतेच्या तत्वज्ञानात आहे ....

हे तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत आणून व कृतीभक्तीतून साकारुन प्रत्येक मनुष्यात "तू भगवंताचा अंश आहेस; त्यामुळे तू हीन, दीन, लाचार असू शकत नाहीस...." असा आत्म गौरव निर्माण करणाऱ्या महापुरुषाचा जन्मदिन म्हणजेच प्रत्येक मनुष्याचाच गौरव दिन.... मनुष्य गौरव दिन  

https://kurookshetr.blogspot.com/2018/10/blog-post_46.html

Friday, October 19, 2018

||श्री:||

"शबरीमाला" एक लिटमस टेस्ट 


              एकूणच "शबरीमाला" हे प्रकरण वाटते तेवढे सोप्पे नाही हे आता पर्यंत आपल्या लक्षात आले असेल. हिंदू धर्म हा कसा स्त्रियांचा द्वेष करतो. स्त्रियांना वाईट वागणूक देतो. हे ठासून व ठळकपणे दाखवण्याचा प्रयत्न सर्वच प्रसार माध्यमे करत आहेत. जेणे करून हिंदू धर्म कसा वाईट; प्रतिगामी हे चित्र उभे करण्याच्या चळवळीचा हा भाग आहे.

            खरं तर मा.सर्वोच्च न्यायालयाचा ह्या निर्णयाचा हिंदूंनीआनंदाने स्वीकार केला असता ! पण त्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयाने ही जरा उदार अंत:करण करणे आवश्यक होते. ज्याप्रमाणे एखाद्या डी. के. बासू केस मध्ये सर्वच अटकेत असलेल्या व्यक्तींच्या हक्का विषयी निर्णय मा.सर्वोच्च न्यायालय देते तर; देशातील सर्वच धर्मियांच्या प्रार्थना स्थळात स्त्री-पुरुष म्हणून दोघांनाही प्रवेश देण्यास काय हरकत होती ? फक्त आपल्या धर्मातील स्त्रिया ह्या स्त्रिया व इतर धर्मीय स्त्रिया या भोगवस्तू असा फरक हिंदू धर्म तरी करत नाही. त्यामुळे कोणत्याही नागरिकाचा वंश, लिंग, धर्म व जन्मस्थानावरुन भेदभाव केला जाणार नाही ह्या अभिवचनाचा भंग केला आहे; असे आपण म्हणू शकतो.

           काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्यांनी "शरियत किंवा कुरणाच्या आदेशात कोणत्याच सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही", असे विधान संभाजी नगर येथे केले तरीही ते पुरोगामी शिरोमणी व सर्वच धर्मियांना हा समान न्याय लावा असे म्हणणारे प्रतिगामी. अशी दुटप्पी भूमिका माध्यमे घेताना दिसत आहेत. शरियत व कुराणा बाबतचा न्याय ह्याही प्रकरणाला लावला असता तर; हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्यांची भूमिका व मत घेणेच नव्हे तर त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे  न्यायव्यवस्थेचे कर्तव्य होते. ते कर्तव्य करण्यात ती व्यवस्था अयशस्वी ठरली त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

               काही वर्षांपूर्वी जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेत काही विधी व रुढींवरुन  वादंग झाला  होता. त्यावेळी सदर वादावर पुरी येथील जगत्गुरू शंकराचार्य यांच्या पीठाने दिलेल्या चाळीस पानांच्या निर्णया नुसार जाण्याचा निर्णय तेथील कार्यकारी समितीने घेतला. त्याबाबत असाच एकाच्या पोटात पोटशूळ उठला व त्याने त्या बाबत मा.उच्च न्यायालय उडीसा यांच्याकडे धाव घेऊन हरकत घेतली. त्यावेळी २० जून २०१७ रोजी सदर याचिकेवर न्याय निर्णय देताना म्हंटले होते की,

" The State Government may however perform its duty of maintaining law and order and providing all necessary assistance for smooth conduct of the Car festival in accordance with the decision of the Managing Committee on the issue of rituals which is based on opinion of HH Shankaracharya, Puri and correctness of which is neither subject matter for consideration of State Government nor before this Court." 

"तथापि, राज्य सरकार प.पु. शंकराचार्य, पुरी यांच्या मतांवर आधारित असलेल्या व्यवस्थापनच्या समितीच्या  विधी (रूढी पद्धती) अनुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व आवश्यक सहाय्य प्रदान करू शकते आणि या गोष्टीची (रूढी व परंपरा) योग्यायोग्यता हा राज्य सरकारच्या किंवा या न्यायालयापुढे विचारात घेण्यासारखा विषय नाही." 

आणि ह्या निर्णया साठी सदर न्यायालयांनी संदर्भ देताना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या न्यायनिर्णयाचा आधार घेतला  त्यात असे निरीक्षण नोंदवले आहे की, 

"The Hon'ble Court observed that the Act provided only for the management of the Temple's secular affairs and did not interfere with its religious affairs which had to be performed as per the Record-of-Rights. The Record-of-Rights covers the rituals associated with the Rath Yatra, which is an annual affair."  

"मा.न्यायालयाने असे निरीक्षण आहे की, कायदा हा केवळ ऐहिक बाबींच्या नियोजनासाठी बनवण्यात आलेला असून अधिकाराभिलेखानुसार आलेल्या धार्मिक बाबीत हस्तक्षेप करण्यासाठी नाही. अधिकाराभिलेखा मध्ये रथयात्रा ह्या वार्षिक उत्सवाबाबत असलेल्या रुढींचा समावेश होतो." 

[संदर्भ :- Raja Bira Kishore Deb, hereditary Superintendent Jagannath Temple, P. O. and District Puri Vs. The State of Orissa, (AIR 1964 SC 1501) ]

        वरील दोन्ही संदर्भांवरून कायद्याच्या सीमारेषा अधोरेखित होत असून सुद्धा त्यांचे अतिक्रमण न्यायव्यवस्थेने केले हे स्पष्ट होते.

पण हे झाले का ?

              का ? दोन्ही पक्षांनी; सत्ताधारी व विरोधकांनी ह्या प्रकरणी मतांचे ध्रुवीकरण कसे होईल ह्या कडेच लक्ष दिले ? का कोणालाही हा प्रश्न सोडवण्य पेक्षा चिघळवण्यात रस होता. ह्यालाही कारण केवळ राजकारण नसून धर्मकारणच आहे हे स्पष्ट दिसते.

ही परीक्षा नक्की आहे कसली ?

             ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर आधी भौगोलिक परिस्थिती समजून घ्यावी लागेल. हे शबरीमाला येते कुठे ? दक्षिण भारतातील केरळ राज्यात. आजच्या दिवशी केरळ राज्याची परिस्थिती लोकसंख्येच्या दृष्टीने आहे तरी कशी ? तर, एकूण ३,४५,३१,००० लोकसंख्ये पैकी ०.१% इतर, १७.८% ख्रिस्ती, २५.६% मुस्लिम, ५६.५% हिंदू अशी विभागणी आहे. ज्या ठिकाणी हिंदू लोकसंख्येच्या दृष्टीने ५०% च्या जवळ येत जातो तस तश्या प्रकारच्या परीक्षा साखळी पद्धतीने सुरु होतात. गेले अनेक वर्ष सातत्याने होत असलेल्या धर्मांतराचा परिणाम म्हणजे गेले काही वर्ष होत असलेल्या हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्या असो किंवा आताचे शबरीमाला प्रकरण हे एकाच साखळीचा भाग आहेत. आणि काही दशकांपूर्वी काश्मिरात घडलेले पंडितांचे शिरकाण हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे ही परीक्षा ही हिंदूंच्या धार्मिक बाबींवर किती प्रमाणात आक्रमण कोणकोणत्या पद्धतीने करु शकतो? त्यावर त्यांची प्रतिक्रिया कोणत्या पातळी पर्यंत येऊन पोहचते ते पाहणे. म्हणजेच काय ? तर ही परीक्षा होती हिंदूंचा सहिष्णुतेची ठरली.

                  त्यामुळे सावधान ! हिंदुच्यात त्यांच्या परंपरांसाठी/धर्मासाठी असलेली उर्मीची पातळी काय? हे तपासण्या साठी ह्यापुढे ही अशा अनेक लिटमस टेस्ट आपल्या पुढ्यात वाढून ठेवल्यात ......!

          आपण त्यात उत्तीर्ण होण्याचा म्हणजेच ह्या तपासण्याच बंद करण्याचा महामार्ग म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा, आचार्य चाणक्यांचा व  श्री शिव छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा मार्ग ..... 

तोच धरण्याची बुद्धी, शक्ती श्री जगदंबा आपल्याला देवो हीच प्रार्थना करूयात ....

हृदयात वास कर तु, तुळजाभवानी॥ 
द्यावास आिशष आम्हा आठही करांनी॥ 
ईच्छायशस्वी करण्या शिवभुपतींच्या॥ 
सेना खड्या आम्ही करु शिवपाईकांच्या॥   

Thursday, October 18, 2018

हा ब्लोग कशा साठी ?



||श्री:||
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा ब्लोग सुरु करण्याचा उद्देश म्हणजे केवळ आणि केवळ सिम्मोलंघन ......