"हिंदूहृदयसम्राट"
"हिंदूहृदयसम्राट" हे बिरुद उच्चारलं तर आमच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती उभी राहत होती. ती म्हणजे "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...!"
१९९२ ला आमच्या घरातील आरशावर लावलेले ते स्टिकर मला आज ही आठवते "गर्व से कहो, हम हिंदू है ।"
"बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान वाटतो!" असे जाहीर बोलण्याची हिंमत ठेवणारा तो एकमेव नेता. बाकी पक्षातील काल-परवा पर्यंत सुद्धा त्याचा आमचा पक्ष म्हणून संबंध नाही असे म्हणणारे नेते पाहिले तर तेव्हा पासूनच आमची ऐट वेगळीच होती. त्यानंतरचा तो सगळा मंतरलेला काळ !सगळं झरकन डोळ्या समोरून जात आणि मग लक्षात येतं....
अमरनाथ यात्रा असो किंवा पाकिस्तानशी असलेले संबंध असो; त्यावर बाळासाहेबांनी हिंदू म्हणून घेतलेली भूमिका ही, प्रत्येक हिंदूला आपलीशी वाटत होती आणि त्यामुळेच त्यांना मिळालेली ही उपाधी म्हणजे "हिंदूहृदयसम्राट" आणि त्यांची सेना म्हणजेच "शिवसेना !"
शिवसेना-ठाणे हे समीकरणच वेगळे होते. सेनेला सत्ता मिळवून देणारं पाहिलं तोरण म्हणजे ठाणं आणि आमच्या ठाण्यात तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या रुपाने शिवसेनेचा ढाण्या वाघ डरकाळ्या न देता ही अनेकांच्या धोतराचं पितांबर करत होताच. पण त्याच वेळी बाबरी पाडण्यात असो किंवा दुर्गाडी, श्री मलंगगड असो त्या त्या ठिकाणी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व राष्ट्रहितार्थ स्पष्ट भूमिका घेणारे शिवसैनिक निर्माण करण्याचे कार्य बाळासाहेबांनी केलं.
सुरवातीच्या काळात खलिस्तान सारखाच विचार काही शिवसैनिकांच्या मनात येत होता. मराठी भाषिकांचा ही वेगळे राष्ट्र असावे. हा विचार करणाऱ्या शिवसैनिकांना थांबवण्याचे काम धर्मवीर दिघे साहेबांनी केले. कारण, हा राष्ट्र द्रोह आहे ! हा असा केलेला विचार सुद्धा बाळासाहेबांना आवडणार नाही म्हणून...
बाळासाहेब शरीराने गेले तरी आचार व विचार म्हणून प्रत्येक शिव सैनिकांत ते आज ही जिवंत आहेत आणि कायम राहतील. त्यांचं शिवसेनाप्रमुख म्हणून असलेलं आसन आमच्या हृदयात ध्रुवताऱ्या सारखं अढळ आहे. जे कोणीही हलवू शकत नाही.
खरं पाहता आजवर महाराष्ट्रात स्वातंत्र्या नंतर शिवजयंती कोणामुळे दिमाखात साजरी होत राहिली असेल तर ती शिवसेने मुळे नाहीतर गांधीजी-पंडितजीच्या मागे लागून आपण श्री शिवप्रभूंचा मार्ग सोडल्यातच जमा होता. खरं म्हणायचं तर, बाळासाहेबांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा आम्ही फार हलक्यातच घेत होतो. असे वाटावे अशी घटना काही वर्षांपूर्वी घडली. पु.संभाजीराव भिडे गुरुजी घरी आले असता बाळासाहेबांच्या प्रतिमेकडे हात दाखवून ते एक वाक्य बोलले.... तेवाक्य म्हणजे बाळासाहेबांच्या जीवनादर्शांना पाहण्याचे क्षितीजच ... !!
ह्यापूर्वी बाळासाहेब माझ्या साठी सहस्त्रपैलू असलेला हिरा होते पण त्यानंतर ते माझ्यासाठी भगवान श्री शिवछत्रपतींच्या गळ्यातील कौस्तुभच झाले; ते वाक्य होते ....
"१८१८ साली श्रीशिव छत्रपतींच्या भगव्या झेंड्याचं राज्य गेलं, युनियन जॅक फडकला, १९४७ साली आपण स्वतंत्र झालो ! पण आपला ध्वज तिरंगा झाला. आपण पुन्हा भगवा स्वीकारण्याचं धाडस केलं नाही ! १८१८ नंतर श्री शिव छत्रपतींच्या भगव्या झेंड्याला राजकीय प्रतिष्ठा मिळवून द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर ते ह्या महापुरुषाने !"
आणि त्यासाठी कार्य करत राहणे हीच आपली त्या महापुरुषाला खरी श्रद्धांजली ....
हृदयात वास कर तू तुळजाभवानी ।
द्यावास आशिष आम्हा आठही करांनी ।।
इच्छा यशस्वी करण्या शिवभुपतींच्या ।
सेना खड्या आम्ही करु शिवसैनिकांच्या ।।
( ----- पु.श्री.संभाजीराव भिडे गुरुजी )
No comments:
Post a Comment