Saturday, December 8, 2018

"महापरिनिर्वाण व २२ प्रतिज्ञा "

"महापरिनिर्वाण व २२ प्रतिज्ञा " 


               काल माझे अनेक मित्र चैत्यभूमीवर एका अलौकिक पुरुषास अभिवादन करण्यासाठी गेले असतील... 
               खरं सांगा....! नक्की काय संकल्प घेतलात ? त्या महापुरुषास अभिवादन करताना ....!
               नसेल घेतलात तर घ्या .... 
कमीत कमी त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा तरी पाळण्याचा प्रयत्न करण्याची  ...... 
भगवान बुद्धांचा सम्यक मार्ग आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्याची .....  

काय आश्चर्य वाटलं ? मी हिंदू असूनही तुम्हांला  २२ प्रतिज्ञा पाळण्याचा प्रयत्न करण्याची विनन्ती करतोय ... 

माझी नितांत श्रद्धा असलेल्या देवांना मानू नका असे सांगणारी प्रतिज्ञेतील वचने मी वाचली नाहीत का ?

हो, ती मी वाचलीत ... 
म्हणूनच मी वरील वाक्य म्हणू शकतो .... 

               भावांनो, ती २२ प्रतिज्ञेतील वाचने वरुन खाली वाचा पण आचरणात आणताना खालून वर या ...  

"इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो"
भगवान बुद्धांच्या शिकवणुकीची मूलभूत तत्वे काय म्हणून ओळखली जातात ....? "आर्य सत्य"
हेच आहे ह्या संस्कृतीचे वैशिष्ठ्य कितीही मतभेद असले किंवा कालानुरूप उद्भवले तरी मूळ गाभा एकच राहतो ... "आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म"


"माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो."

"मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो" असे बाबासाहेब सांगत असले तरी; धर्म समजणारा प्रत्येक हिंदू ही मनात व आचरणात हीच भावना ठेवतो .... धर्मातील ज्या रूढी सत्याशी/नैसर्गिक कायद्याशी विसंगत आहेत त्या नष्ट झाल्याच पाहिजेत नाहीतर त्या ज्या धर्मात आहेत त्या धर्मालाच त्यांच्या सोबत नष्ट करतील.

ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
मी दारू पिणार नाही.
मी खोटे बोलणार नाही.
मी व्याभिचार करणार नाही.
मी चोरी करणार नाही.
मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
हा थोडासा कठीण भाग प्रतिज्ञातला सुरु होतो .... कारण हा भाग मानण्यावर आधारित नसून आचरणावर अवलंबून आहे .... 

सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
आता मात्र हा विषय थोडा खोल जातो ... अष्टांग मार्ग, दहा परिमिता ह्यांचं रोज नावं घेऊन चिंतन जरी केलं तरी वरच्या दोन भावना "सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन." आपल्या मनात स्थिर होण्यास प्रारंभ करतील.... कारण तसं आपण मनात जरी मानत असतो तर आपल्या पैकी अनेकांच्या मनात आजही "हिंदू-ब्राह्मण-वैदिक म्हणजेच थोडक्यात आपल्या भाषेत मनुवादी" ह्या शब्दां बाबत राग द्वेष संताप येण्या ऐवजी "करुणेचा" प्रादुर्भाव झाला असता ..... तो ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण अष्टांग मार्गावर चालण्यास प्रारंभ केला असे म्हणू शकू... 

                  मी ब्रह्माविष्णूमहेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
                      मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
   
              आता मला सांगा तो पंढरीचा पांडुरंग आणि ज्ञानोबांपासून तुकोबां पर्यंत सगळी संत मंडळी तरी वेगळं काय सांगतोय ? आईबापाची सेवा करा, आचरण व मन, चित्त, बुद्धी शुद्ध ठेवा.... 

              मग तुम्ही त्याच्या पर्यंत जाण्याची गरज नाही तोच तुमच्या पर्यंत येईल आणि जसा पुंडलिका साठी तिष्ठत उभा राहिला तसाच तुमच्या साठी राहील ... 
            पण केव्हा ? जेव्हा ह्या आधीचं सगळं केलं असेल तर....   
            केवळ वरील नकारात्मक कोणतीही गोष्ट करण्यास काहीही हरकत नाही ... 
            कारण त्यानंतर होणारी प्रत्येक कृती ही प्रतिक्रियात्मक न होता क्रियात्मक होते ....  
            आणि अहंकार, राग, द्वेष विरहित; सद्भावपूर्ण अंतकरणाने केलेली कोणतीही कृती ही पूजाच ठरते ... 

अंतरंगातील सात्विक विचारांचे स्फुरण म्हणजे तत्व रुपाने ब्रह्माचेच पूजन..... 
मन चित्त बुद्धी व आचरणात सद्गुणांनाचे पालन म्हणजेच विष्णूचे तत्वरुपाने पूजन.... 
आपल्यातील दुर्गुणांचा नाश म्हणजेच चित्तात महादेवाचा वास .... 

             कोणी Sun ( सन) म्हणावं; कोणी सूर्य किंवा त्याच्या अस्तित्वाशी आम्हांला देणं घेणं नाही म्हणून त्याचं अस्तित्व नाकारावे त्याने सूर्याला फरक पडत नसतो .... पण ते नाकारण्या आधी अंतरीचा ज्ञान दिवा पाजळला गेला पाहिजे; त्यासाठी आपण सर्वानी तयार होऊन अष्टांग मार्गाने आचरण शुद्धी केलीच पाहिजे .... 
नाहीतर ज्या भगवान बुद्धांच्या ओंजळीत बाबासाहेब आपल्या महापरिनिर्वाणाच्या आधी सोडून गेले त्यांचा आदेश न मानण्याचे पातक आपल्या कडून घडेल. तो आदेश म्हणजे;  

            "अत्त दीप भव।"
             तुम्ही धर्म म्हणा किंवा धम्म तत्व रुपाने ते एकच आहे.... 

             अहं ब्रह्मास्मि। म्हणून आत्म रुपाला ओळखण्यास तळमळणारा मुमुक्षू असो किंवा महाबोधी अथवा बुद्ध पदाला पोहचण्याची इच्छा धरणारा श्रमण ... 

              दोघांचे मार्ग वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचे गंतव्य एकच आहे चिरंतर सुख म्हणजेच सत-चित-आनंद .... 

              तरी आज पासून ४ आर्यसत्यांचा स्वीकार करुन अष्टांगमार्गाचा अवलंबन करुन ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वत: सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्धाचे अनुयायी होण्यास पात्र होण्याचा प्रयत्न करु .... 
               
              नाहीतर बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण आपण आपल्या हातानेच करत आहोत असे समजावे ..... 

              साधू साधू साधू    

 .

No comments:

Post a Comment