गोवारीकरांचे पानिपत आणि चांदोबा
खरं म्हणजे सध्या इतिहास पटांच्या दर्जा मुळे जावं की नाही ह्या दुविधेत असताना बायकोला दाखवायचा म्हणून गेलो ..
आणि बायकोला चित्रपटाला घेऊन गेलो की पहिले काय होतं ? तर तो उशीर. तो व्हायचा तोच झाला त्यामुळे उदगीरच्या लढाई नंतर मी पोहचलो ..
शेवटून दुसऱ्या रांगेत असल्याने सगळी गर्दी बघत बघत गेलो तरी त्यात बहुतांश बिगर महाराष्ट्रीय होती. आमच्या बाजूला एक बाप आपल्या मुलीला घेऊन आला होता. ती मुलगी मधून मधून ज्या प्रकारे बापाला प्रश्न विचारत होती त्यात खरी गंमत होती.
इतिहास अभ्यासकच काय ? पण माझ्या सारखा अतिसमान्य इतिहासाचा विद्यार्थी ही अनेक चुका त्यातून काढू शकतो..
पण तूर्तास त्या बाजूला ठेऊयात..
ह्याला एक कारण आहे; कारण पैसे कमावणे हा विषय सोडल्यास ह्या चित्रपटातून दिग्दर्शकाला एकच गोष्ट सांगायची आहे असे प्रकर्षाने जाणवते; ती म्हणजे "देव-देश-धर्मासाठी अखंड हिंदुस्थानचा विचार करणारी एकच जात आहे ती म्हणजे "मराठा" (मराठा तितुका मेळवावा वाला)."
ह्या चित्रपटातील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे दोन पताकांचा भगवा ध्वज आणि ज्यावेळी सदाशिवराव भाऊ दिल्लीच्या त्या मग्रूर मयूरासना समोर जातात त्यावेळी एक उत्सवाच नाच-गाण दाखवले आहे. ते १००% मराठ्यांनी तसे नाचले असतील असे मला वाटत नाही पण त्यांची मनं मात्र नक्कीच नाचली असतील. तर.. त्या गाण्यात जाणीव पूर्वक एक गोष्ट दाखवलीये ज्या मुळे त्यांच्या १०० चुका पोटात घ्यायला मला काहीही वाटणार नाही; ते म्हणजे...
ज्या ठिकाणी त्या दरबारात श्री शिवप्रभू उभे राहिले असतील ती जागा कल्पून तिथे रांगोळी काढून तिथे त्यांची आठवण म्हणून जिरेटोप व तलवार पार्वतीबाई पूजतात. हे चित्रीकरण बघताना टचकन डोळ्यात पाणी येऊन जाते आणि गुरुजींच्या एका वाक्याची आठवण येते, "ते दिल्लीचे तख्त फोडणारे हात जरी भाऊचे असतील तरी; त्या मनगटा मागची प्रेरणा श्री शिवछत्रपतीच आहेत; भाऊंचे ते रूप म्हणजे श्री शिवछत्रपतींचे प्रखर रूप आहे.. (म्हणजेच विभूति योग आहे.) "
मराठीत सिनेमॅटिक लिबर्टी की काय म्हणतात त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
ह्या अशा गोष्टी हिन्दी चित्रपट सृष्टीत सहसा दाखवल्या गेल्या नाहीत .. ते ह्यांनी दाखवलं ह्याचं कौतुक आहेच ..
हा मुळात सर्वसामान्य व्यक्तींसाठीचा चित्रपट आहे..
ज्यांना पानिपताच्या तपशीलापेक्षा पानिपताचा उद्देश समजून घेण्यात रस आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे.. माझ्या ह्या म्हणण्या वर अनेक इतिहासप्रेमी व आक्षेप घेऊ शकतात .. पण एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल ..
वाल्मिकी रामायणात सीता स्वयंवर, लक्ष्मण रेखा, राम नामाने तरंगणारी दगडे इत्यादी गोष्टी नाही आहेत.. पण तुलसी रामायणात आहेत, आणि त्याच गोष्टी अधिक प्रचलित आहेत .. पण त्यातून सामान्य माणसांचे काही नुकसान नाही आहे झालीच तर श्रद्धा वाढवणे इतकांच त्या बाबतचा हेतु आहे.. त्यामुळे ते क्षम्य आहे ..
आणि गंमत सांगू का ? खर म्हणजे संहित्यातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या असतील तर पहिले बडबडगीतांवर बंदी आणायला लागेल .. कारण चंद्र हा तुमचा मामा नसून पृथ्वीचा एक उपग्रह आहे आणि त्यावर खड्डे आहेत, त्याला पृथ्वी व स्वत:भोवती फिरायला २७ दिवस लागतात हे कोणी आमच्या "ध्रुवराज" ला सांगितले तर हातात असेल ते त्याच्या डोक्यात घालायला कमी करणार नाही .. आणि तो ते करण्या आधी मीच ते करीन. कारण "चांदोमामा" आकशात पाहिल्या नंतर त्याच्या तो ज्या आनंदाने व उत्साहाने तोंडावर हात ठेऊन आनंदित होतो ! त्या समोर सारं शहाणपण ओवाळून टाकावसं वाटतं ..
पण आज तपशीलांच्या तापलेल्या तव्यावर आपल्याला केवळ दिसणाऱ्या व आनंदा (तो ही तुमच्या मनात असेल तर) शिवाय काहीही न देणाऱ्या कोणाशी ही नातं जोडण्याची सवय लाऊन पुष्ट होणारे भावविश्व करपवणे हे मला तरी जमणार नाही..
भविष्यात तो त्याच्या कुवती नुसार चंद्र शिकेल, चंद्र ग्रहण ही शिकेल इतकेच काय चांद्र मोहिमही करेल .. त्याच प्रमाणे आज गोवारीकरांचा पानिपत बघणारे उद्या विश्वास पाटील, शेवडे गुरुजी, कुलकर्णी, यांची पुस्तके वाचण्यास उद्युक्त होतील ..
त्याही पुढे जाऊन आपापल्या कुवती प्रमाणे हे ज्यांच्या प्रेरणा प्रकाशातून घडले त्या शिवप्रभूं पर्यंत पोहचतील.. त्यातील काही जण आजून पुढे जाऊन भारतभूच्या एकता व एकात्मता अखंड ठेवण्यास उद्युक्त होतील ..
पण तो पर्यंत आजतागायत श्री शिवप्रभूंच्या स्फूर्ति प्रेरणेतून उभे राहिलेले हजारो चांदोबा आम्हाला नव्या पिढीला हवेत .. फक्त त्यातील हेतु शुद्ध व अंतकरण श्रद्धायुक्त हवे .. नाहीतर "बजने दे धडक धडक" करणारे नालायक "संज्याचे बाजीराव" आहेतच ..
त्या पेक्षा हा गोवारीकरांच्या पानिपताचा चांदोबा हा उजवा म्हणावा लागेल ..